दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या.
ही संपूर्ण चराचर सृष्टी पंचतत्वांनी बनलेली आहे.
आकाश,वायू,अग्नी,जल आणि पृथ्वी या पाच तत्वांपासून सृष्टीतील प्रत्येक पदार्थ मग तो सजीव असो वा निर्जीव बनलेला आहे.
यातील अग्नितत्वाचे महत्व अधिक आहे. याच अग्नीप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दिव्यांची पूजा केली जाते.
या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.
आषाढ अमावस्या वेळ:
२८ जुलै २०२२ मंगळवार पहाटे ५ वाजून ५२ मिनिट ते
२९ ऑगस्ट २०२२ बुधवार सकाळी ८ वाजून २१ मिनिट
आषाढ दीप अमावस्या ह्या दिवशी काय करावे:
ह्या दिवशी भगवान शिव, पार्वती, गणेश व कार्तिक स्वामींची पूजा करतात. व काही जण ह्यादिवशी व्रत सुद्धा करतात.
या दिवशी घरातील सर्व दिवे धुऊन स्वच्छ करावेत.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
ह्या दिवशी महिला तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात.
ह्या दिवशी पुरणाचा नेवेद्य बनवून पितरांना दाखवतात.
ह्या दिवशी पितरांना तर्पण देवून पुरणाचा नेवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात व त्यांना मुक्ती मिळून आपल्याला आशीर्वाद देतात.
आषाढ दीप पूजा कशी करावी :
दीप अमावस्या पूजा विधी: ह्या दिवशी आपल्या घरात असणारे दिवे, समया, लामण दिवे सर्व घासून पुसून स्वच्छ करतात.
मग एका पाटावर लाल रंगाचे कापड घालून पाटा भोवती छान रंगीत रांगोळी काढावी.
पाटावर दिवे मांडून त्याच्या भोवती फुले ठेवून सजावट करावी.
मग सर्व दिव्यामद्धे कापसाची डबल वात घालून तेल घालावे व दिवे प्रज्वलित करावे.
जर आपल्याला शक्य असेल तर ओल्या मातीचे दिवे सुद्धा बनवून पूजेत ठेवावे.
काहीजणांकडे कणकेचे गोड दिवे बनवून लावण्याची सुद्धा प्रथा आहे.
दिव्याना हळद-कुंकू व अक्षता वाहून त्याची मनोभावे पूजा करावी.
मग नेवेद्य दाखवावा त्यामध्ये गोड दिवे ठेवावे. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखवावा.
निरांजन आरती करावी मग कहाणी ऐकावी.
संध्याकाळी दिवे लावल्यावर शुभंकरोती म्हणावी व घरातील लहान मुलांना ओवाळावे.
घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण करावे.
खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
अर्थात ‘‘ हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर ’’ .
आपल्या संस्कृतीत दिव्याला खूप महत्व आहे. घरातील इडापिडा टळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते, आणि हीच आपली प्रथा आहे.