“चैतन्याचा गाभा…विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर
उभा विटेवर
कर कटेवर ठेऊनिया भगवंता,
तव तेज ह्या तिमिरात दे आता”
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!
आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी.
त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची आणि पूज्य मानली जाते.
धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. पुराणानुसार असे मानले जाते की आषाढी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात.
या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.
पण वर्षातील या एकादशीला एक विशेष ओळख आहे. हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. आषाढी एकादशीला भगवान विष्णूची आराधना आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच "आषाढी वारी" म्हणतात.
आषाढी एकादशीचा उपवास
एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचे असते. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे.
हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. ह्या उपवासात अल्पोपहार घेणे नेहमी योग्य. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात निरंकार उपवास करणे सर्वांनाच जमतं असं नाही. अश्या वेळेला झटपट आणि भूक तृप्त होईल असे पदार्थ करावे. जसेकी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, परंतु ह्यासाठी लागणारा वेळ पाहता ह्या पारंपारिक पदार्थांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. म्हणून रेडी शेंगदाणा कूट वापरून हे पदार्थ झटपट रेडी होतात. ऑर्डर करण्यासाठी क्लिक करा.
पंढरीची वारी परंपरा
पूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात. त्या समूहांना ‘दिंडी’ असे म्हणतात. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायीपायी चालत जातात. आता मात्र नव्या दिंडया जातीय व्यवस्थेवर आधारित नाहीत.
प्रत्येक दिंडीचे ५ ते १० पर्यंत ध्वज असतात. ते ध्वज कावेने रंगविलेले असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज, शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू पांढरपेषा लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष , काहीवेळा अख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होते. साधारणत: धोतर किंवा पायजमा, सदरा,गांधी टोपी असा पुरुषांचा तर नऊवारी साडया असा स्त्रीयांचा पोषाख असतो.
ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग, भक्तीरसात न्हालेले मन आणि ऊन-पाऊस-वादळ-वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले असे हे जनताजनार्दनाचे रुपडे असते.
विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा असतो. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.
आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणो सोडायचे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीही करण्यात येतो.
‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,
कोण बोलविते हरीविण,
देखवी दाखवी एक नारायण,
तयाचे भजन चुको नका’
या समर्पक ओवीच्या आविर्भावात चेह-यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता वारकरी दिंडीबरोबर चालत रहातात. पंढरपूर येथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्य पदरात पडल्याचे समाधान मिळवायचे असते.
पंढरपूरच्या मंदिरात आणि आसपासच्या परिसरात माणसांचा महापूर लोटतो. बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबा-रखुमाईची महापूजा होते. विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते. या आरतीत एकादशीच्या सोहळयाचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. दिवसभर हा परिसर भजन – कीर्तनाने दुमदुमून निघतो. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे आणि घराघरातील लहान ते मोठया वयातील व्यक्ती या आषाडी एकादशी चा उपवास करतात.
या आषाडी निमित्त महाराष्ट्रसह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात. जसे कि पैठणहून एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी, देहूहून तुकारामांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी हि पंढरपुरास येत असते.
शेगाव या ठिकाणावरून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी हि पंढरपुरास रवाना होते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात, स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी या एकादशी स देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हंटले जाते. आषाढी एकादशीला दिंडी यात्रा निघते महाराष्ट्र हे अनेक थोर संतांचे कार्यस्थान आहे. या संतांच्या जन्म किंवा समाधीस्थळावरून या पालख्या आणि दिंड्या निघतात, त्या पंढरपूरला जाण्यासाठी लांबचा प्रवास करतात.
चातुर्मास
चातुर्मास हा ४ महिन्यांचा कालावधी आहे, जो आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चालतो. चार महिने व्रत, भक्ती आणि शुभकर्मांना हिंदू धर्मात ‘चातुर्मास’ म्हणतात. जे लोक ध्यान करतात आणि आध्यात्मिक साधना करतात त्यांच्यासाठी हे महिने महत्त्वाचे आहेत. या दरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक स्थितीच नाही तर वातावरणही चांगले राहते.